घरकुलासाठी लाचेची मागणी, २० हजार रुपयांसह शिपाई आणि रोजगार सेवकाला रंगेहाथ अटक...!

कोल्हापूर - प्रधानमंत्री घरकुल योजनेतील प्रलंबित हफ्ते मंजूर करून देण्यासाठी ग्रामपंचायतीतील शिपाई आणि रोजगार सेवकाने मिळून लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिपाई राहुल निंबाळकर याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तसंच सहकार्य केल्याबद्दल रोजगार सेवक सुरज पाटील याच्याविरुद्धही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. दोघेही हेरले, ता. हातकणंगले गावचे रहिवाशी आहेत.
तक्रारदाराचे वडील यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. घरकुलाच्या प्रलंबित हफ्त्यांसाठी पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार ग्रामपंचायत हेरले येथे गेले होते. तेथे शिपाई राहुल निंबाळकर याने, “वरीष्ठ कार्यालयातून हफ्ते मंजूर करून देतो, पण त्यासाठी २५ हजार रुपये द्यावे लागतील,” अशी लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतीबंधक विभागाला कळवली. त्यानुसार लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने पडताळणी केली असता, निंबाळकर याने २५ हजाराची लाचेची मागणी करून २० हजार रुपयांवर तडजोड केल्याचं केल्याचे निष्पन्न झाले. यास रोजगार सेवक सुरज पाटील याचे सहकार्य मिळाले, असेही तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर कोल्हापूरातील लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई रचली आणि राहुल निंबाळकरला पंचासमक्ष लाच स्वीकारताना अटक केली. अटक करण्यात आलेल्या शिपाई राहुल निंबाळकर व रोजगार सेवक सुरज पाटील यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतीबंधक विभाग पुणे विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, तसेच पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो.हे.कॉ. सुधीर पाटील, पो.कॉ. संदीप पवार, पो.कॉ. कृष्णा पाटील, पो.कॉ. प्रशांत दावणे यांनी केली.