मिरजमध्ये बनावट नोटा प्रकरण उघडकीस; चहा सेंटरमध्ये छपाई, कोल्हापुरातील पोलिसासह ५ जण अटकेत

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी परिसरात बनावट चलन छापून त्याचा वापर करण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच संशयितांना मिरज पोलिसांनी अटक केली आहे. ही बनावट नोटांची छपाई एका अपार्टमेंटमधील चहा सेंटरमध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रुईकर कॉलनीतील सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा सेंटरवर छापा टाकला. छाप्यात छपाईसाठी लागणारे साहित्य, प्रिंटर, सॉफ्टवेअर आणि मोठ्या प्रमाणावर 200, 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, सर्वजण मिरज परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बनावट नोटांचा वापर करून बाजारात खरेदी करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होता. संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा राज्य पातळीवरील रॅकेटशी संबंध आहे का? याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी बाजारात किंवा खरेदी करताना शंका वाटणाऱ्या नोटांची खातरजमा करावी. संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्ती अथवा व्यवहाराबद्दल तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा असं आवाहन पोलिसांनी केलंय.