‘त्या’ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालकांसह १३ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

चंडीगड – हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांच्यासह १३ पोलीस अधिकाऱ्यांवर आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये ज्या-ज्या अधिकाऱ्यांची नावं नमूद केली होती त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पूरन कुमार हे २००१ च्या बॅचचे हरियाणा केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नऊ पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये १३ अधिकाऱ्यांची नावं नमूद करण्यात आली होती.
पूरन कुमार यांच्या आरोपांच्या आधारावर त्यांच्या पत्नी व वरिष्ठ आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी बुधवारी चंदीगडच्या सेक्टर ११ येथील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. अमनीत यांनी त्यांच्या तक्रारीत हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह कपूर व रोहतकच्या पोलीस अधीक्षकांचं नाव नमूद केलं आहे. या दोघांसह हरियाणा पोलीस दलातील इतर काही अधिकाऱ्यांनी पूरन कुमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप अमनीत कुमार यांनी केला आहे.