तळसंदेतील शाळेत रेक्टरकडून विद्यार्थ्याला मारहाण; पीव्हीसी पाईपने डोक्यात मारून जखमी

<h3><strong>तळसंदेतील शाळेत रेक्टरकडून विद्यार्थ्याला मारहाण; </strong><strong>पीव्हीसी पाईपने डोक्यात मारून जखमी</strong></h3>

हातकणंगले - तळसंदे येथील श्री शामराव पाटील निवासी व अनिवासी शिक्षण संस्था संकुल येथे किरकोळ वादातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर रेक्टरकडून मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी रेक्टर राहुल कोळी यांच्या विरोधात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संस्थेच्या वसतीगृहात राहणारा सिद्धीविनायक मोहीते (वय 16) हा विद्यार्थी इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. दि. 06 ऑक्टोबर 2025 रोजी त्याचं आणि वर्गमित्र पृथ्वीराज कुंभार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावर रेक्टर राहुल कोळी यांनी दोघांना ताकीद दिली होती. मात्र, दि. 07 ऑक्टोबर रोजी पी.टी. परेड दरम्यान, रेक्टर कोळी यांनी पूर्वीच्या वादाचा राग धरून, सिद्धीविनायकला स्टेजवर नेले आणि पी.व्ही.सी. पाईपने पाठीवर व डोक्यावर मारहाण केली, अशी पोलिसांत माहिती देण्यात आली आहे. या मारहाणीत विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर विद्यार्थ्याचे वडील सनी गौतम मोहीते (वय 38, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. उचगाव) यांनी बुधवारी (दि. 0८) वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून राहुल कोळी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, याच शाळेतील विद्यार्थ्यांवरील अन्य मारहाणीचे जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हे व्हिडीओ रेक्टर कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच व्हायरल झाल्याचे समजते.