नऊ महिन्यांत दोन हजारांहून अधिक कारवाया...

पाच कोटींचा मुद्देमाल जप्त एक्साईजची माहिती

<p>नऊ महिन्यांत दोन हजारांहून अधिक कारवाया...</p>

कोल्हापूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या आठवडाभरात गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दारूची तस्करी, विक्री साठवणूक प्रकरणी १५३ गुन्हे दाखल करून १३२ संशयित आरोपींना अटक केलीय तर ३० वाहने जप्त केलीत. या कारवाईत एकूण ४५ लाख ६८ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ जानेवारी २०२५ पासून ३० सप्टेंबर पर्यंत अवैध मद्य  तस्करी, विक्री, साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध व्यवसायाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केलाय. जानेवारी ते सप्टेंबर नऊ महिन्यांमध्ये दोन हजार २८ गुन्हे दाखल करत एक हजार नऊशे सतरा संशयित आरोपिना अटक केली तर एकशे पंचावन्न वाहने जप्त केलीत तर तब्बल ५ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वर्षभरातील कारवाईत अकरा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय, अशी माहिती नरवणे यांनी दिली.

गेल्या ९ महिन्यात विविध ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवरही स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाया केल्यात. यामध्ये आर. के. नगर, मोरेवाडी कंजारभाट वस्ती, माणगाव, मोतीनगर, राजेंद्रनगर या परिसरातील कारवायांचा समावेश आहे. यापुढंही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया सुरू ठेवणार असल्याचे नरवणे यांनी सांगितले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष युवराज शिंदे उपस्थित होते.