करवीर पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी धाड; १४ जणांवर गुन्हा, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठी कारवाई करत १४ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या कारवाईत सव्वा लाखाच्या रोख रकमेसह एकूण ३३ लाख ५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.
याबाबतची माहिती अशी, पाचगाव इथल्या आण्णा पाटील नगर मधील संजय बाबुराव भोटे यांच्या मालकीच्या घरात बिगर परवाना तीन पत्ती जुगार खेळ सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी(दि.७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी घरमालक संजय बाबुराव भोटे, जुगार मालक योगेश मोहन सुर्यवंशी, संतोष गायकवाड यांच्यासह अरविंद सखाराम कुचेकर (वय २९, राजेंद्रनगर), अनिकेत बळवंत कदम (वय ३२,यवलुज), प्रकाश विष्णु बुचडे (वय ३२, माळवाडी, यवलुज),उत्तम राजेंद्र भोसले (वय ४२, उद्यमनगर), अतिष गोरोबा कांबळे (वय ३०, जोशीनगर झोपडपट्टी), कुणाल रणजित परमार (वय ३६, गुजरी), सागर खंडु कांबळे (वय ३०, राजेंद्रनगर), सौरभ अशोक पोवार (वय २९) – सोमवार पेठ, कोल्हापूर, अमोल बुकशेट (कसबा बावडा), रवी सोनटक्के(राजेंद्रनगर) या तेरा जणांना ताब्यात घेतलंय. उर्वरित ३–४ इसम पोलिसांची चाहूल लागताच घटनेस्थळावरून फरार झाले. त्यांच्याकडून १,२५,४३०/- रुपये रोख रक्कम, ८ मोबाईल फोन, ३ मोटरसायकली, २ चारचाकी गाड्या आणि १ रिक्षा असा ३३,०५,४३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अधिक तपास करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे करतायत.