१.६६ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; सेवानिवृत्त समादेशक खुशाल सपकाळे आणि त्यांच्या पत्नीविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल

<p>१.६६ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; सेवानिवृत्त समादेशक खुशाल सपकाळे आणि त्यांच्या पत्नीविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल</p>

कोल्हापूर – भारत राखीव बटालियन क्र. ३, कोल्हापूरचे सेवानिवृत्त समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे आणि त्यांच्या पत्नी हेमांगी खुशाल सपकाळे यांच्याविरोधात अपसंपदा प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खुशाल विठ्ठल सपकाळे हे एका लाचखोरी प्रकरणात संशयित होते. २०१८ साली शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लाच प्रकरणातील (गु.र.नं. ४०१/२०१८) तपासात, सपकाळे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकूण १,६६,३३,९९१/- इतकी बेहिशेबी संपत्ती जमवली असल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम त्यांच्या जाणिवपूर्वक उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा ७५.९८% अधिक आहे. त्यामुळे यांच्याविरोधात अपसंपदा प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार खुशाल सपकाळे यांच्या मुंबईतील मरोळ येथील निवासस्थानासह इतर संपत्तीची झडती सुरू असून अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या तपासाअंती करण्यात आली.