चंद्रे गावात भीषण आग; प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली

राधानगरी – राधानगरी तालुक्यातील चंद्रे गावामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास रघुनाथ शिवराम पाटील यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घराच्या वरच्या मजल्यावर असलेले अन्नधान्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जळण यासह सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक युवक आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी संजय सातार्डेकर, सरपंच प्रभाकर पाटील आणि ग्रामसेवक सुरेश परीट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीत रघुनाथ पाटील यांचे शेतमजूर कुटुंब प्रचंड अडचणीत आले असून संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.