इचलकरंजीत भूमिगत गॅस पाइपलाईनजवळ अचानक आग...
शहरातील भूमीगत गॅस पाईपलाईनने वाढवले टेन्शन.

इचलकरंजी - शहरातील यशवंत कॉलनी परिसरातील काही महिला देवदर्शनासाठी अनवाणी जात असताना त्यांना जमिनीवर चटके बसत असल्याचं जाणवलं. यामुळं संशय आल्यानं त्यांनी तिथं पाणी ओतून पाहिलं तेव्हा तिथून वाफा निघू लागल्या.
या घटनेची माहिती मिळताच, तेथील गॅस पाइपलाईन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी करून महावितरणला कळवलं. मात्र त्यांना नेमकं कारण समजw शकलं नाही. यानंतर स्थानिक माजी लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना पाचारण करून सूक्ष्म तपासणी केली असता जमिनीखाली आग लागल्याचं स्पष्ट झालं यानंतर त्वरित अग्निशामक दलाला बोलावण्यात आलं अग्निशामक दलानं पाण्याच्या फवाऱ्यांनी काही वेळातच आग विझवली. जेसीबी मशीनच्या साहाय्यानं जमीन खोदून कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही आगीचं कारण स्पष्ट झालं नाही. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये गॅस स्फोटात तीन जणांचा मृत्यू झालाय. अशी दुर्घटना इचलकरंजीत घडू नये यासाठी त्वरीत उपाययोजना होणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं.
याच परिसरातून अवजड वाहनं जात असतात. अनेकदा वाहनांना मागं पुढं करताना एस आर शंभर च्या कठड्याला धक्के लागले आहेत. त्यामुळं भूमीगत गॅस पाईपलाईनला धोका पोहचून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करत स्थानिकांनी अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक झालेल्या या गॅस पाइपलाईनचा एस आर शंभर हा भाग तातडीने सुरक्षित जागी स्थलांतरित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी मधुसूदन मालपाणी, कपिल शेटके, शिवचंद्र जाखोटिया, प्रवीण राठी, शशिकांत भळगट, पंकज जैन, स्वरूप शेटके आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते.