लाचखोरीप्रकरणी खाजगी वकील रंगेहाथ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

<p>लाचखोरीप्रकरणी खाजगी वकील रंगेहाथ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात</p>

कोल्हापूर : कोल्हापूर येथील मिळकतीवरील ‘ब सत्ता प्रकार’ कमी करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने लाच मागणाऱ्या खाजगी वकिलाला अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. विनायक सुरेश तेजम (वय ३७, रा. फ्लॅट नं. A-9, मंजुळा अपार्टमेंट, के.डी.सी.सी. बँक समोर, शाहूपुरी, कोल्हापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

तक्रारदाराने त्याच्या मालमत्तेवरील ‘ब सत्ता प्रकार’ कमी करण्यासाठी करवीर प्रांत कार्यालयात अर्ज केला होता. संशयित वकील विनायक तेजम याने संबंधित काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडून यापूर्वीच १,६५,००० रुपये घेतले होते. मात्र, यानंतरही तो प्रकरणाचा आदेश काढण्यासाठी प्रांत कार्यालयात आणखी २५,००० रुपये देणे लागेल, असे सांगत लाचेची मागणी करत होता.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विरोधी प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगानं केलेल्या पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाल्याने लाचलुचपत विरोधी प्रतिबंधकने सापळा रचून पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तेजम याला २५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच कर्मचारी सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील आणि प्रशांत दावणे यांनी केली.