बनावट सरकारी कागदपत्र तयार करून शासन आणि विद्यापीठाची फसवणूक

कोल्हापूर - पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड, सरपंच व ग्रामसेवकांचे खोटे शिक्के व सही मारून बनावट सरकारी कागदपत्रं तयार करून शासन आणि विद्यापीठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. निरंजन दिलीप गायकवाड (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असं संशयित आरोपीचं नाव असून ग्रामसेवक अजित राणे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आलाय. पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतलंय. गायकवाड हा भाजपच्या स्थानिक नेत्याचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्यान शहरात खळबळ उडालीय.
कोल्हापुरातील महालक्ष्मी विकास संस्थेच्यावतीनं पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नागपूरच्या पशु व मत्सविज्ञान विद्यापीठकडं प्रस्ताव दखल केला होता. त्यानुसार पोपट नारायण कर्जुले यांनी शेळीपालन शेडसाठी वापरलेला उतारा खरा आहे की खोटा याची माहिती पाचगाव ग्रामपंचायतीकडं मागितली होती. ४ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायतीनं असा कोणताही दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलं. पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रस्तावास जोडलेला दाखला महाराष्ट्र पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनीही बोगस असल्याचं सांगितलं. संस्थेचे सचिव असलेल्या निरंजन गायकवाड यांच्याविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल. ग्रामसेवक अजित राणे यांच्या फिर्यादीवरून गायकवाड विरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आलाय. पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेतलंय. फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, आणि शासनाची दिशाभूल करणे या गुन्ह्यांखाली त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निरंजन गायकवाड हा भाजपच्या स्थानिक नेत्याचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याची माहितीही समोर आली असून, सोशल मीडियावर त्यांचे एकत्रित फोटो झळकतायत. यामुळं या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. या निमित्तानं शैक्षणिक अभ्यासक्रम मंजुरीच्या प्रक्रियेत योग्य पडताळणी झाली का? अशा बनावट दस्तऐवजांना अडवण्यासाठी यंत्रणांची कार्यक्षमता कितपत सक्षम आहे? स्थानिक राजकीय संबंधांचा गैरवापर होत आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.