इचलकरंजीत कबनूर ग्रामपंचायतीजवळ पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला !.. गंभीर जखमी

<p>इचलकरंजीत कबनूर ग्रामपंचायतीजवळ पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला !.. गंभीर जखमी</p>

इचलकरंजी - शहरालगत असणाऱ्या कबनूर गावात भरदिवसा पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. जुन्या वादातून सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ चार ते पाच हल्लेखोरांनी प्रमोद शिंगे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर धारदार कोयत्यानं हल्ला करून गंभीर जखमी केलंय. यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. 

इचलकरंजी व परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आज कबनूर गावात भररस्त्यात भरदिवसा एका पती-पत्नीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला. प्रमोद शिंगे व अश्विनी शिंगे हे दोघे चारचाकी वाहनातून जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अचानक चार ते पाच जणांनी त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रमोद शिंगे यांच्या हातावर, मानेवर गंभीर वार झाले असून त्यांच्या हाताची करंगळी तुटून खाली पडली. पत्नी अश्विनी शिंगे यांच्या हातावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली असून समोरील आणि मागील काचा फोडण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामागे जमीर मुल्ला, आर्यन मुल्ला आणि अन्य दोघे मिळून असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. शिंदे व मुल्ला कुटुंबांमध्ये जुना वाद असल्याचं सांगितलं जातंय. त्याच रागातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जातीय. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले असून शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. गाडीसह दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. जखमी पती-पत्नीवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरूयत. या घटनेमुळे कबनूर गावात खळबळ उडालीय. डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करतायत.