एच. पी. ऑईल गॅस प्रा. लि. प्रकल्प अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ठाकरे गटाची जोरदार मागणी

<p>एच. पी. ऑईल गॅस प्रा. लि. प्रकल्प अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ठाकरे गटाची जोरदार मागणी</p>

कोल्हापूर - मनोरमा कॉलनी येथे झालेल्या गॅस पाईपलाईन च्या स्फोटात भोजणे कुटुंबातील शितल, आनंद आणि प्रज्वल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या स्फोटामागे कंपनीचा निष्काळजीपणा व बेकायदेशीर कामपद्धती कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एच. पी. ऑईल गॅस प्रा. लि.चे मुख्य प्रकल्प अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा (IPC 304) गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन जुना राजवाडा पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटलंय की, अपघाताच्या ठिकाणी रस्ता खुदाईसाठी महापालिकेकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. याशिवाय, गॅस जोडणी करताना तांत्रिक अटींचे उल्लंघन व सुरक्षा निकषांची पायमल्ली झाल्यानेच हा भीषण स्फोट झाला आहे. महापालिकेने एच. पी. ऑईल गॅस प्रा. लि. सोबत केलेल्या करारात ठरलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला आहे. कराराच्या जबाबदारीत मुख्य प्रकल्प अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असून त्यांचा निष्काळजीपणा तीन निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार आहे. त्यामुळे  मुख्य प्रकल्प अधिकारी बाबासाहेब सोपानराव सोनवणे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सध्या शहरात ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईनची कामे झाली आहेत, ती देखील निकृष्ट दर्जाची असून, भविष्यात अशाच आणखी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे तातडीने थर्ड पार्टी ऑडिट करणे गरजेचे आहे. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करावा अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल,' असा इशारा ठाकरे गटाने निवेदनाद्वारे दिला आहे.