रांगोळी येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह ; पाच जणांवर गंभीर गुन्हा दाखल
कोल्हापूर - डिसेंबर २०२४ मध्ये हातकणंगले तालुक्यातील रांगोळी या गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला. संशयित आरोपी राकेश नलवडे याने मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवून अत्याचार केला असल्याची माहिती बाल विकास विभागातील महिला पर्यवेक्षिका सुनीता कोळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्नाटकातील निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झिरो नंबरने तक्रार दाखल केली. त्यानंतर पुढील तपासासाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी कागद पत्रांची तपासणी केली. राकेश ज्योतीराम नलवडे, ज्योतीराम सीताराम नलवडे, फुलाबाई ज्योतीराम नलवडे, अशोक कोंडेकर आणि अमृता अशोक कोंडेकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.