LCB निरीक्षक निवडीसाठी नवी प्रक्रिया; समितीच्या अहवालावर होणार अंतिम निर्णय

<p>LCB निरीक्षक निवडीसाठी नवी प्रक्रिया; समितीच्या अहवालावर होणार अंतिम निर्णय</p>

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदाच्या निवडीसाठी आता समितीमार्फत प्रक्रिया राबविण्याचे आदेश मॅट न्यायाधिकरणाने दिले आहेत. या समितीच्या अहवालाच्या आधारे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक रवींद्र कळमकर यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये राजारामपुरी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी निरीक्षक सुशांत चव्हाण यांची नियुक्ती झाली होती. या बदलीविरोधात कळमकर यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती.

सुनावणीनंतर न्यायाधिकरणाने कळमकर यांचा अर्ज अंशतः मंजूर केला. मात्र, बदली तात्काळ रद्द करण्याऐवजी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पाच निरीक्षकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. समितीमार्फत रवींद्र कळमकर, सुशांत चव्हाण तसेच इतर तीन निरीक्षकांच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल पोलिस अधीक्षकांमार्फत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला जाईल. त्यानंतरच नवीन निरीक्षकाची अंतिम निवड केली जाणार आहे. या निर्णयामुळे निरीक्षक निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.