कोल्हापूर पोलिसांनी मुद्देमाल नागरिकांना केला परत...

<p>कोल्हापूर पोलिसांनी मुद्देमाल नागरिकांना केला परत...</p>

कोल्हापूर - पोलीस दलाच्यावतीने आज पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला. गेल्या वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पोलिसांनी संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. आज पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून हा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत करण्यात आला.

पोलिसांनी घरफोडीच्या बारा गुन्हयांमधील संशयितांकडून हस्तगत केलेले सहाशे एकावन्न ग्रॅमचे सोन्याचे आणि दोनशे सोळा ग्रॅम चांदीचे दागिने, अठ्ठावीस दुचाकी, बारा मोबाईल संच असा सुमारे एक कोटी सात लाख सदतीस हजार आठशे बत्तीस रुपयांच्या मुद्देमालातील ६५१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २१६ ग्रॅम चांदीचे दागिने, २८ दुचाकी आणि १२ मोबाईल संच असा सुमारे एक कोटी सात लाख ३७ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत परत करण्यात आला.

चोरीला गेलेला ऐवज, वस्तू परत मिळाल्याने फिर्यादींनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी चोरी, घरफोडी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास लोकांनी तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी, असे आवाहन करत पोलिस नक्कीच फिर्यादींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.