हातचलाखी करून वयस्कर महिलांना फसवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक
कोल्हापूर - २६ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला आजरा हायस्कुलजवळ हौसा भाईंगडे या महिलेला अनोळख्या पुरुषाने आणि महिलेने थांबवत पुढे दंगा झाला असून पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. असं सांगत त्यांना अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवा असे सांगितले. त्यानंतर हौसा भाईंगडे यांची दिशाभूल करत त्यांच्याकडील दागिने लंपास केले.
भाईंगडे यांनी आजरा पोलिसांत तक्रार दाखल केली. कोल्हापूर एलसीबीने या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत पथके तयार करुन तपास सुरु केला. पोलीस अंमलदार समीर कांबळे आणि राजु कोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील संशयित हे दागिने विकण्यासाठी महामार्गावरील उजळाईवाडीच्या हद्दीत एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या तपास पथकाने सापळा रचनू राकेश यंकाप्पा गोंधळी, दुर्गव्वा गंगाप्पा कंहले आणि मंजुळा राकेश गोंधळी या निपाणी मधल्या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.