एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणाचे धागेदोरे चंदगडपर्यंत; म्हाळेवाडीत एएनटीएफची कारवाई

<p>एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणाचे धागेदोरे चंदगडपर्यंत; म्हाळेवाडीत एएनटीएफची कारवाई</p>

चंदगड : मुंबईतील वाशी येथे उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणाच्या तपासात चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथील तरुणाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र (कोकण विभाग) पथकानं शुक्रवारी रात्री म्हाळेवाडीत धडक कारवाई करत त्याला अटक केली. या कारवाईमुळं तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव प्रशांत यल्लाप्पा पाटील (रा. म्हाळेवाडी) असे असून, त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील वाशी येथे अब्दुल कादर रशीद शेख याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत मूळचा म्हाळेवाडीचा व सध्या बेळगाव येथे वास्तव्यास असलेला प्रशांत पाटील हा एमडी ड्रग्ज निर्मितीमध्ये सहभागी असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार चंदगड पोलिसांच्या मदतीने ही अटक करण्यात आली.

प्रशांत पाटील याने बीएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, त्याच्यावर यापूर्वी २०२३ मध्ये सानपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज प्रकरणात त्याचे नाव समोर आले आहे. याआधी २०२२ मध्ये ढोलगरवाडी येथे एमडी ड्रग्ज कारखाना तसेच एका पोल्ट्रीमध्येही पोलिसांनी कारवाई केली होती.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, एम. एम. मकानदार, कृष्णात पिंगळे, रामचंद्र मोहिते, संतोष गावशेते व नीलेश बोधे यांच्या पथकाने केली.