पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात
घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल; राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा
पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी बंडू आंदेकरची पोलीस व्हॅनमधून सिनेस्टाईल एन्ट्री पाहायला मिळाली. पोलिसांच्या बंदोबस्तात, हाताला बेड्या आणि तोंडावर काळा स्कार्फ घालून त्याला अर्ज भरण्याच्या ठिकाणी आणण्यात आले.
यावेळी बंडू आंदेकरने जोरदार घोषणाबाजी करत, “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही”, “नेकी का काम आंदेकर का नाम”, “आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत” अशा घोषणा दिल्या. तसेच “लोकशाहीत मला कसं आणलंय ते बघा” असे म्हणत पोलिस कारवाईवर अप्रत्यक्ष टीकाही केली.
बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना नगरसेवक होता. त्यानंतर आता बंडू, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी यापूर्वी लक्ष्मी आणि बंडू आंदेकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बंडू आंदेकर यालाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, या घटनेनंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार पुण्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.