अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; ५७ कोटींच्या एमडी ड्रग्जसह तीन कारखाने उद्ध्वस्त

<p>अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; ५७ कोटींच्या एमडी ड्रग्जसह तीन कारखाने उद्ध्वस्त</p>

मुंबई : महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोकण पथकाने नवी मुंबईतील कारवाईनंतर थेट बंगळूरपर्यंत तपासाचा धागा नेऊन तब्बल ५५ कोटींपेक्षा अधिक किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करत तीन अवैध कारखाने नष्ट केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२१ डिसेंबर २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रच्या कोकण पथकाने नवी मुंबई वाशी गावातील पुणे–मुंबई महामार्गाजवळील जुन्या बस डेपो परिसरात छापा टाकत आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याच्याकडून १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या ड्रग्जची बाजार किंमत सुमारे १ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासात बेळगाव येथे राहणारा प्रशांत यल्लापा पाटील हा एमडी ड्रग्ज तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान एमडी ड्रग्ज बंगळूर येथील तीन ठिकाणी तयार होत असल्याची माहिती समोर आली.

पोलीस पथकाने बंगळूर येथे धडक देत राजस्थानचे रहिवासी परंतु बंगळूर शहरात अवैध एमडी ड्रग्ज व्यवसाय करणारे सुरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी स्पंदना लेआउट कॉलनी, एनजी गोलाहळी येथील ‘आर जे इव्हेंट’ नावाची फॅक्टरी तसेच येरपनाहळी कन्नूर परिसरातील लोकवस्तीतील आरसीसी घरामध्ये एमडी ड्रग्ज तयार केल्याची कबुली दिली. या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून ४ किलो १०० ग्रॅम एमडी, द्रव स्वरूपातील १७ किलो एमडी असा एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, तसेच ड्रग्ज निर्मितीचे साहित्य व विविध रसायने असा सुमारे ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासोबतच हे तिन्ही एमडी ड्रग्ज कारखाने पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत. या कारखान्यांत तयार केलेले एमडी ड्रग्ज देशातील विविध राज्यांमध्ये वितरित केले जात असल्याचे तपासात उघड झाले असून, या अवैध व्यवसायातून आरोपींनी बंगळूर शहरात मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सध्या या गुन्ह्यात चार आरोपी अटकेत असून आणखी दोन महत्त्वाच्या आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उप महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुणे आणि कोकण कृती गटातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बंगळूर येथे जाऊन अत्यंत कौशल्यपूर्ण ही कारवाई पार पाडली.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अंमली पदार्थांबाबतची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्यच्या ०७२१८००००७३ या क्रमांकावर कळवून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी संदर्भात संपर्क क्रमांक -
1. एम.एम मकानदार, पोलीस अधीक्षक पुणे कृती गट.
मोबाईल: 09922004400

2. कृष्णात पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक पुणे कृती गट.
मोबाईल : 09552561898