फलटण डॉक्टर प्रकरण : सुसाईड नोट ही ‘डायिंग डिक्लेरेशन’, सरकारी वकिलांचा दावा
फलटण – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमधील मजकूर हा ‘डायिंग डिक्लेरेशन’ म्हणून ग्राह्य धरण्याची मागणी सरकारी वकील सुचिता वायकर-बाबर यांनी न्यायालयात केली.
सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडले की, “मरण्याच्या आधी व्यक्ती खोटं बोलत नाही” असा सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टांत असून, मृत डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेले तपशील हे घटनास्थळ व आरोपींच्या भूमिकेबाबत महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. सुसाईड नोटमध्ये लैंगिक अत्याचाराचा उल्लेख असून, त्या घटनेची माहिती केवळ दोन व्यक्तींनाच म्हणजे मृत डॉक्टर आणि आरोपी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे डिजिटल पुरावे आणि मोबाईल तपासणीसाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
दरम्यान, आरोपीच्या वतीने वकील राहुल धायगुडे यांनी कोठडीला विरोध केला. त्यांनी सांगितले की, एफआयआरमधील नोंदी परस्परविरोधी असून, सुसाईड नोटमध्ये मुख्य आरोपी प्रशांत बनकर याच्याशी असलेल्या वादाचा उल्लेख आहे. बदने याचे नाव त्यात थेट नसल्याने त्याला अन्यायाने फसवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सह-दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांनी बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांकडून आता आरोपीचा मोबाईल फोन, डिजिटल पुरावे आणि सुसाईड नोटचे फॉरेन्सिक तपास अहवाल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.