प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींची सुनावणी शुक्रवार, दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. ही सुनावणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्राधिकृत केलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात होईल. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकत व सूचना सादर केलेल्या सर्व संबंधितांना या सुनावणीस लेखी नोटीसेद्वारे बोलावण्यात आले आहे. सुनावणीस येताना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे. यावेळी कोणतेही नवीन लेखी निवेदन स्वीकारले जाणार नाही. लेखी हरकत व सूचनेमध्ये नोंदवलेले मुद्देच सुनावणीस घेतले जाणार आहेच. एकाच हरकतीवर अनेक व्यक्तींच्या सह्या असतील तर त्यातील केवळ दोन व्यक्तींना सुनावणीसाठी संधी दिली जाईल. वेळेत उपस्थित न राहिल्यास पुन्हा सुनावणीस वेळ दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्यावतीने सर्व हरकतदारांनी वेळेत व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.