गँगस्टर छोटा राजनला सुप्रीम कोर्टाचा धक्का...

नवी दिल्ली – गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे छोटा राजनला मोठा धक्का बसला आहे.
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजन जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता परंतु सुप्रीम कोर्टाने तो रद्द केल्याने छोटा राजनला आता जामीन मिळणार नाही.
२००१ साली झालेल्या हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत जामीन मंजूर केला होता. मात्र, इतर अनेक प्रकरणात दोषी असल्यामुळे तो तुरुंगातून बाहेर आला नव्हता.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, छोटा राजन गेल्या २७ वर्षांपासून फरार होता. ज्या प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यामध्ये साक्षीदारांनी साक्ष दिली नाही म्हणून ती झाली आहे. सध्या तो इतर गुन्ह्यांखाली तुरुंगातच आहे. त्यामुळे जरी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला असला तरी, तो तुरुंगातून बाहेर येणार नाही.