संजय भोसले बेकायदेशीर नेमणूक प्रकरणी उद्या सर्किट बेंचमध्ये होणार सुनावणी

<p>संजय भोसले बेकायदेशीर नेमणूक प्रकरणी उद्या सर्किट बेंचमध्ये होणार सुनावणी</p>

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी संजय भोसले याच्याविरोधात बेकायदेशीर नेमणूक, पदोन्नती, व घरफाळा घोटाळा यासारख्या गंभीर आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झालाय. माजी उपमहापौर भूपाल शेटे व सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत रामाने यांनी २०२० पासून वेळोवेळी भोसले यांच्या विरुद्ध लेखी तक्रारी प्रशासनाकडं दिल्या होत्या. संजय भोसले यांनी प्रशासकांच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात सिव्हिल दावा दाखल करून यामध्ये त्यांनी स्थगिती आदेश मिळवला होता. या आदेशाला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं स्थगिती दिलीय. यावर संजय भोसले यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलीय. स्थगिती दिलेल्या याचिकेवर उद्या सोमवारी १५ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणारय, अशी माहिती माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलीय.

प्रसिद्धीपत्रकात माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी असं म्हटलंय कि, "संजय भोसले यांनी १९९२ मध्ये कनिष्ठ लिपीक म्हणून केएमटी (KMT) मध्ये सेवा सुरू केली. पुढे २००२ मध्ये परिवहन विभागात अकौंटंट पदासाठी त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मात्र, औद्योगिक न्यायालयात यासंदर्भात ULP 238/2003 हा दावा दाखल झाला, आणि दि. ५ सप्टेंबर २००३ रोजी ही निवड बेकायदेशीर ठरवण्यात आली. या निकालाविरुद्ध संजय भोसले यांनी रिट पिटीशन क्र. ९७४/२००५ उच्च न्यायालयात दाखल केली. पण तीही दि. २१ जुलै २००५ रोजी नामंजूर झाली. सर्व कागदपत्रांचा विचार करून तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दि. १ ऑक्टोबर २०२० रोजी नितीन देसाई (अतिरिक्त आयुक्त) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीच्या अहवालानुसार भोसले यांची अधिक्षक पदावर झालेली पदोन्नती बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं. त्यांना मूळ कनिष्ठ लिपीक पदावर पाठवण्याची शिफारस करण्यात आली. या अहवालावरून तत्कालीन प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी कारणे दाखवा नोटीस दिली. संजय भोसले यांनी प्रशासकांच्या आदेशाविरुद्ध सिव्हिल दावा क्र. ५८६/२०२१ जिल्हा न्यायालयात दाखल केला. यामध्ये त्यांनी स्थगिती आदेश मिळवला, मात्र कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. १८५/२०२२ मध्ये दि. २७/०१/२०२३ रोजी ती स्थगिती रद्द केली. त्याविरुद्ध संजय भोसले यांनी रिट पिटीशन क्र. ३७४८/२०२३ मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून, या याचिकेवर उद्या सोमवारी १५ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणारय."