दौलतच्या कामगारांचा कारनामा! जाणूनबुजून चुकीचे फिटिंग करून मोठ्या अपघाताची शक्यता

<p>दौलतच्या कामगारांचा कारनामा! जाणूनबुजून चुकीचे फिटिंग करून मोठ्या अपघाताची शक्यता</p>

हलकर्णी - अथर्व दौलत साखर कारखान्यातील काही कामगारांनी जाणूनबुजून खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कारखाना गाळप हंगाम सुरू करण्यासाठी तयारी सुरू होती. यावेळी कारखान्याची मुख्य रॅक कॅरिअर फिरवताना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले की, ते कामगारांनी जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने बसवले आहे. तांत्रिक विभाग, सुरक्षा अधिकारी आणि पंच यांच्या उपस्थितीत तपासणी केल्यानंतर असे आढळले की, संबंधित कर्मचारी हे 20 ते 25 वर्षांपासून हाच विभाग सांभाळत असून त्यांना पुरेसा अनुभव आहे. तरीदेखील मुख्य कॅरिअर उलटे बसवण्यात आले होते, ज्यामुळे रॅक कॅरिअरचा खालचा व बाजूचा भाग पूर्णतः घासला जाऊन नुकसान झाले आहे.

या निष्काळजी व खोडसाळ कृतीमुळे कारखाना सुरू असताना मोठा अपघात होऊन कारखाना, शेतकरी व वाहतूकदार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते, तसेच जीवितहानीचीही शक्यता होती.

घटनेनंतर व्यवस्थापनाने तत्काळ उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुख्य रॅक कॅरिअर पुन्हा उघडून योग्य तांत्रिक पद्धतीने बसविण्याचे काम सुरू केले असून हे काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.

या घटनेनंतर कारखान्याच्या इतर विभागांचीही कसून तपासणी सुरू असून इतरत्रही जाणूनबुजून अशा प्रकारे खोडसाळपणा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कर्मचाऱ्यांनी “आमच्याशिवाय कारखाना सुरू होऊ नये” या हेतूने अशा निंदनीय व खेदजनक कृती केल्याचे निदर्शनास आले आहे.

या सर्व प्रकाराबाबत व्यवस्थापनाने पंचनाम्याच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पाहणीदरम्यान कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, अधिकारी, पोलिस पाटील व कर्मचारी उपस्थित होते.