दौलत-अथर्व साखर कारखाना सुरू होण्याच्या मार्गावर

१८० कामगारांची हजेरी; हंगाम यशस्वी करण्याचा खोराटे यांचा निर्धार

<p>दौलत-अथर्व साखर कारखाना सुरू होण्याच्या मार्गावर</p>

चंदगड : गाळप हंगाम अगदी तोंडावर आला असताना दौलत-अथर्व साखर कारखान्यातील कामगारांनी शिफ्टवर बहिष्कार टाकल्याने कारखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी जवळपास १८० कामगारांनी कामावर हजेरी लावली. त्यामुळे कारखाना सुरू होण्याच्या दिशेने सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे.

कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कामगारांचा एक पगार बोनस (८.३३%) वर्ग करण्यात आला आहे. तसेच, जे कर्मचारी आज (सोमवार, दि. ३ नोव्हेंबर) कामावर हजर झाले आहेत, त्यांचाही बोनस जमा केला जाणार आहे.

कामगारांच्या बहुतांश मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्यांवर चर्चा सुरू ठेवण्याची तयारी कारखाना प्रशासनाने दर्शविली आहे. तथापि, काही कामगारांनी शिफ्टमध्ये कामावर हजर होण्यास नकार दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

या पार्श्वभूमीवर चेअरमन खोराटे यांनी कामगारांना स्पष्ट इशारा दिला होता की, “शिफ्टमध्ये या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” त्यानंतर काही कामगारांनी प्रतिसाद देत हजेरी लावल्याने कारखाना सुरू करण्याच्या दिशेने प्रक्रिया गतीमान झाली आहे.

“कोणत्याही परिस्थितीत गाळप हंगाम यशस्वी करणारच,” असा निर्धार व्यक्त करत खोराटे म्हणाले, “कामगारबंधू हे कारखान्याचेच लोक आहेत. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत.”

खोराटे पुढे म्हणाले, “काही लोकांनी कामगारांची दिशाभूल करून क्षमतेच्या बाहेरील आश्वासने दिली. मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन पगारवाढ आणि इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय दिला. परंतु काही पुढाऱ्यांमुळे सर्वच कामगारांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ आली.”

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत खोराटे यांनी शेवटी म्हटले, “शेतकऱ्यांचे आणि तोडणी-वाहतूकदारांचे नुकसान होता कामा नये. त्यांच्या हितासाठी हा हंगाम यशस्वी करणे हेच आमचं ध्येय आहे.”