तासगावकर काळातील थकीत एफआरपी दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

कोल्हापूर - दौलत साखर कारखान्यावर असलेली एसडीएफच्या कर्जाची टांगती तलवार दूर करून तासगावकर काळातील थकीत एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलीय . त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारय अशी माहिती अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
तासगावकर काळात दौलत कारखान्याची थकीत एफआरपी रक्कम १४ वर्ष शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. ही रक्कम देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, एनसीडीसीकडून थकीत कर्जामुळे कारखाना लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि एफआरपी वाटप थांबवण्यात आले. या संकटावर मात करून, न्यायालयात लढा देत कारखाना सभासदांच्या ताब्यात ठेवण्यात अथर्व इंटरट्रेड कंपनीला यश मिळालंय. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार थकीत एफआरपीची रक्कम पुन्हा वाटपासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचं अथर्व प्रशासनानं जाहीर केलं.
दरम्यान, शेतकऱ्यांना १४ वर्षांनी मिळणारी ही एफआरपी दिवाळीत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करून आमचं वचन पूर्ण केलं असं अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितलं.
दुसरीकडे, दौलत साखर कारखान्याच्या कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर अथर्वने आपली बाजू कायदेशीर आणि आर्थिक निकषांवर मांडली होती.गुरुवारी कामगार संघटनेसोबत चर्चेसाठी ते स्वतः कारखान्यावर गेले होते.मात्र, संघटनेचे प्रतिनिधी निमंत्रण देवून देखील चर्चेला आले नाहीत. त्यामुळं त्यांच्या मागण्यांच्या आडून कारखाना बंद पाडण्याचा कट शिजत असल्याचा संशयही अध्यक्ष खोराटे यांनी व्यक्त केला.