अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; संस्थेला १४.६६ लाखांचा नफा, यावर्षी लाभांश वाटप

<p>अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; संस्थेला १४.६६ लाखांचा नफा, यावर्षी लाभांश वाटप</p>

यशवंतनगर – चंदगड तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या अभय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, कोवाड या संस्थेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.२६) खेळीमेळीत पार पडली. अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील गरजूंसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरलेल्या या संस्थेने अवसायनाच्या उंबरठ्यावरून नफ्यात वाटचाल करत सभासदांचा विश्वास पुन्हा मिळवला आहे. संस्थेचे एकूण २६२२ सभासद असून गेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या भागभांडवल आणि निधीत लक्षणीय वाढ झाली आहे. संस्थेच्या सध्या ४ कोटी ४२ लाख ३४ हजार ५५३ रुपये इतक्या ठेवी असून, ४ कोटी ४७ लाख १५ हजार ४७७ रुपयांची कर्ज वसूल करायची आहे.

➡️थकबाकी वसुली आणि कायदेशीर कारवाईतून भरघोस वसुली - 
चालू आर्थिक वर्षात संस्थेकडून सव्वा दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त वसुली करण्यात आली आहे. त्यापैकी, कलम १०१ अंतर्गत कायदेशीर कारवाई करून तब्बल १ कोटी ९ लाख ९५ हजार २५१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. माजी संचालक आणि काही कर्मचाऱ्यांच्या गैरकारभारासोबतच कोरोनाच्या कालखंडात संस्थेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती, मात्र सध्याच्या संचालक मंडळाने स्वच्छ आणि काटकसरीचा कारभार करून संस्थेला १४ लाख ६६ हजार २७५ रुपयांचा नफा मिळवून दिला आहे.

➡️दिवाळीपूर्वी लाभांश वितरण - 
सभासदांना दिलेल्या शब्दानुसार येत्या १६ ऑक्टोबरपासून लाभांश वाटप सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सभासदांनी आपला फोटो, आधारकार्ड आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे संस्थेकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

➡️सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी भेट - 
अलीकडेच सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आणि तालुका सहनिबंधक सुजय येजरे यांनी अभय पतसंस्थेला भेट दिली. त्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन कौतुकाची थाप दिली आणि संस्थेने जिल्ह्यात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले.

➡️संगणकीकरण आणि विश्वासार्ह सेवा - 
संस्थेच्या चारही शाखा पूर्णतः संगणकीकृत असून सभासदांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. स्वच्छ कारभारामुळे संस्थेवरील सभासदांचा विश्वास वाढला असून, ठेवी, पिग्मी, कर्ज वितरण आणि वसुलीत भरीव प्रगती होत आहे.

दरम्यान, "सभासदांनी संस्थेशी अधिक व्यवहार करावा आणि संस्थेच्या आर्थिक बळकटीस हातभार लावावा. कर्जदार व थकबाकीदारांनी आपली थकबाकी वेळेत भरून कायदेशीर कारवाई टाळावी." असे आवाहन संस्थेचे चेअरमन उत्तम पाटील यांनी केले आहे.