राजाराम कारखान्याची सभा चाळीस मिनिटांत गुंडाळली...

कोल्हापूर - छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा सत्ताधाऱ्यांकडून लवकर गुंडाळण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली. कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज चाळीस मिनिटांत गुंडाळण्यात आली.
सत्ताधाऱ्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच आपल्या समर्थकांना सभा स्थळी बसवलं होतं सभेसाठी सभासद आणि बिगर सभासदांना आणून समोर बसवले होते. विरोधकांना आत येता येणार नाही अशी पध्दतशीरपणे नियोजन केलं होतं.
सभेच्या सुरुवातीला राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीचे सभासद जोरदार घोषणाबाजी करत सभास्थळी दाखल झाले. त्यांनी माईकसह सभास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले. सभेमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर काही वेळानंतर विरोधकांना माईक न घेता सभेमध्ये जाण्याचा पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, अगोदरच बॅरिकेटस लावल्याने त्यांना आत सभेमध्ये प्रवेश करता आला नाही. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
वारसा हक्कांन सभासद झालेच पाहिजे, मयत सभासदांची साखर मिळालीच पाहिजेत, कारखान्यावर मोठं कर्ज असताना नवीन प्रकल्प राबवून कारखान्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे. हे प्रकल्प थांबवले पाहिजेत अशा मागण्या करत "आमदार सतेज पाटील साहेबांचा विजय असो, राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीचा विजय असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सभेमध्ये घेतलेल्या विषयांना विरोधकांनी नामंजूर च्या घोषणा देत विरोध दर्शवला मात्र सत्ताधाऱ्यांनी गोंधळात सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा केली आणि अवघ्या चाळीस मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.