छत्रपती राजाराम कारखाना सभा..! राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे सत्ताधाऱ्यांना लेखी प्रश्न सादर
छत्रपती राजाराम कारखाना.. यादी प्रश्नांची... प्रतीक्षा उत्तरांची

कोल्हापूर - कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी २९ सप्टेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या सभासदांनी एकत्र येत कारखान्या संदर्भातील विविध प्रश्न लेखी स्वरूपात कारखाना प्रशासनाकडे दिले आहे.
कारखान्याचे जवळपास साडेतीन ते चार हजार सभासद मयत आहेत. त्यांच्या वारसांना त्वरित सभासद करून घेण्या संदर्भात कोणता स्थगिती आदेश असल्यास त्याची कागदपत्रे वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करावीत, साखर कारखान्यावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या कर्जाच्या बोजा संदर्भात खुलासा करण्यात यावा, सध्या कारखान्याच्या मशिनरींचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता वाढ करणे आणि सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुळात गेल्या ५ ते ७ कारखाना कार्यक्षेत्रात कुठेही ऊस क्षेत्रात वाढ झालेली नाहीय असे असताना गाळप क्षमता कशी वाढवणार ? अशी विचारणा करत आधुनिकीकरण करून कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढणार असल्याचे सभासदांकडून सांगण्यात आले आहे. ताळेबंद परिशिष्टांमधील क तरतूद भाग भांडवला पैकी येणे बाकी चार कोटी ऐंशी लाख पंधरा हजार ६१ रुपये इतकी दिसून येतीय. ज्या सभासदांचा ऊस कारखान्याकडे येत नाही, काही सभासद अपात्र आहेत अशा सभासदांची यादी वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचून दाखवण्यात यावी. अहवालात नफा - तोटा पत्रकात भविष्यात कधीही जमा होऊ न शकणाऱ्या रकमा उत्पन्नात जमा घेतल्या आहेत. यामुळे कारखाना तोटात असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी वार्षिक सर्वसाधारण सभेत खुलासा व्हावा. कारखाना एफआरपी इतके उत्पन्न मिळवण्यात अपयशी ठरतोय त्यामुळं पोकळ जमा खर्च करून तोटा कमी दाखवण्या बाबत सभेत खुलासा व्हावा, असे लेखी प्रश्न परिवर्तन आघाडीच्या वतीने कारखान्याचे सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती यांच्याकडे देण्यात आले आहे
. यावेळी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब देशमुख, दिनकर पाटील, सुरेश पाटील, विलास पाटील, बी.आर पाटील, अण्णा रामन्ना, राजू बेणाडे, अभिजित माने, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे यांच्यासह कारखान्याचे सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.