'गोकुळ'ने पार केला प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा
गोकुळ मध्ये दूध संकलनाची संकल्पपूर्ती
कोल्हापूर - गोकुळ दूध संघाने स्थापनेपासूनच दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. विविध सेवा-सुविधांचा आणि पारदर्शक कारभाराचा थेट परिणाम म्हणून दूध उत्पादकांचा गोकुळ दूध संघावर असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.
गोकुळच्या सभासदांनी नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हातात कारभार सोपवल्यानंतर या नेत्यांनी गोकुळचे दूध संकलन प्रतिदिन वीस लाख लिटर करण्याचा संकल्प केला होता. लाखो दूध उत्पादकांचा सक्रिय सहभाग आणि संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे संघाने आज प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.
आज गोकुळ दूध संघाने एकूण २० लाख ५ हजार लिटर दूध संकलन केले आहे. यामध्ये म्हैशीचे दूध १० लाख ७३ हजार लिटर तर गायीचे दूध ९ लाख ३२ हजार लिटर इतके आहे. ७ जून २०२१ रोजी संचालक मंडळाने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला होता. दूध उत्पादकांचा विश्वास, सेवा-सुविधा आणि संघटित प्रयत्नांचे हे फलित असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.