उद्योग-व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सामुदायिक आणि संघटित प्रयत्नांची गरज — रवींद्र माणगावे यांचे आवाहन

कोल्हापूर – "उद्योग आणि व्यापार क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण सर्वांनी सामुदायिक आणि संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत," असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे होते. माणगावे यांनी "व्यापार-उद्योगावरील आव्हाने, संधी आणि संघटनेचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन करताना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. बाजार समितीमधील सेस रद्द करण्याची, तसेच महाराष्ट्रातील उच्च विजदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगत कोल्हापुरी चप्पल सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी चर्मकारांचे क्लस्टर तयार करणार असल्याचं सांगून सर्वतोपरी सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
विजदर कमी झाल्याचे परिपत्रक काढले जात असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप संजय शेटे यांनी केला. त्यामुळे उद्योजकांची फसवणूक होत असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच, GST लागू असतानाही बाजार समितीकडून सेस वसुली सुरू असल्याने ती त्वरित थांबवण्याची मागणी केली. प्लास्टिक वापराच्या नियमांचे पालन करूनही अधिकाऱ्यांकडून “५०० ते १००० रुपयांची मागणी करून व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो,” विनाकारण त्रास दिला जातो, अशी तक्रार संजय शेटे यांनी यावेळी मांडली.
कार्यक्रमात चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, आनंद माने, माजी आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्ष राजू पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, राहुल नश्टे, विज्ञानंद मुंडे व महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष रवींद्र मालू आदी मान्यवर उपस्थित होते.