महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे, तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांचे अर्ज दाखल...
कोल्हापूर - येत्या सहा फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महापौर, उपमहापौर यांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजिंक्यतारा कार्यालयात महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांची बैठक पार पडली. माजी आमदार ऋतुराज पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महाविकास आघाडीकडून पूर्ण ताकदीने महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक राजेश लाटकर यांनी, सध्या महाविकास आघाडीकडे ३५ तर महायुतीकडे ४६ असे संख्याबळ आहे. मात्र त्यांच्या नेतेमंडळी आणि नगरसेवकांत ताळमेळ दिसत नाही. याचा फायदा आपल्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ नावे वाचून दाखवली. यामध्ये विशाल चव्हाण, विनायक कारंडे, सचिन शेंडे, उमेश पोवार, दिलशाद मुल्ला, जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, पुष्पा नरूटे आदींचा सहभाग होता. या सर्वांना त्यांचे मत विचारण्यात आले. यावेळी सर्वांनी एकमताने निवडीबाबत समिती जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे सांगितले तर उपमहापौर निवडीसाठी सुद्धा निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी सांगितले.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून महापौर पदासाठी सचिन मारुती शेंडे, तर उपमहापौर पदासाठी दास कदम यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना माजी ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण इतिहास घडवला आहे. सर्वात मोठा पक्ष आपण ठरलो असून या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकट्याने झुंज देत, वादळात दिवा लावण्याचे काम केले आहे. फक्त कोल्हापूर नाही तर संपूर्ण राज्याने हा इतिहास पाहिलाय. सध्या महायुतीच्या नेते मंडळीत आणि नगरसेवक यांच्यामध्ये ताळमेळ नाही, आपण घट्ट राहिलो तर विजय आपलाच आहे, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार जयंत आसगावकर यांनी, चांगला कारभार करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो. यात कमी पडायचे नाही म्हणून आपण लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आमदार सतेज पाटील यांचा आदर्श समोर ठेवून ही निवडणूक आपण लढवायची असून महायुतीची नेतेमंडळी महापौर, उपमहापौर उमेदवारांची भांडणे सोडवण्यात व्यस्त आहेत. याचा फायदा आपल्याला नक्की होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आनंद माने, सूर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, बाळासाहेब सरनाईक, सुनील मोदी, भारती पोवार, सरलाताई पाटील, संजय पोवार वाईकर, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान दुपारी साडेतीन वाजता महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नगरसचिव सुनील बिद्रे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारला. यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.