राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर खा. प्रफुल्ल पटेलांचा खुलासा
मुंबई - केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचा गौप्यस्फोट केल्याची माहिती समोर येत होती. यावर खा. प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत निवडीबाबत नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे कि, माध्यमांमध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबाबत काही बातम्या प्रसारित होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या बातमीत कोणतेही तथ्य नाही, हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत ज्येष्ठ नेते, आमदार यांच्याशी सल्लामसलत करून, पक्षाच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर राखूनच निर्णय घेतला जातो. राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा निर्णयांसाठी आम्ही ठरलेली आणि पारदर्शक प्रक्रिया पाळतो.