वडकशिवाले–बेले–कोथळी येथे काँग्रेसचा प्रचार दौरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निगवे खालसा - निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार सागर पाटील व तानाजी पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत वडकशिवाले, बेले आणि कोथळी गावांमध्ये प्रचार बैठका पार पडल्या. या बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रचार दौऱ्याची सुरुवात वडकशिवाले गावातील सैनिक हॉलमध्ये आजी-माजी सैनिक संघटनेच्या बैठकीने झाली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सैनिकांना मार्गदर्शन केले. सैनिक हॉल बांधून दिल्याबद्दल सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. आमदार सतेज पाटील यांनी विकासकामांसह आरोग्य सुविधांच्या माध्यमातून केलेल्या मदतीचा उल्लेख करत, त्यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रा. निवास पाटील यांनी केले.
त्यानंतर बेले गावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बैठक घेण्यात आली. यावेळी ऋतुराज पाटील यांनी पुढील काळात बेले गावच्या विकासाची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही दिली. . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उमेदवार एकनाथ पाटील, तानाजी पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मनोगतं व्यक्त केली.
कोथळी गावात पदयात्रा काढत केदारनाथ मंदिर चौकात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना ऋतुराज पाटील यांनी स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत काँग्रेस पक्षाशी असलेल्या त्यांच्या एकनिष्ठतेचा उल्लेख केला. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावर आमदार सतेज पाटील लढत असून पुढील काळात आपण ताकदीने जनतेच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन देत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार दौऱ्यात विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.