अलमट्टी धरणाची उंची वाढवायला केंद्रीय जल आयोगाचा नकार...
कोल्हापूर, सांगलीला मोठा दिलासा
नवी दिल्ली - सांगलीतील अॅड.विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का?, तसंच धरणाची उंची वाढवायला मंजुरी दिलीय का ? अशी विचारणा पत्राव्दारे केली होती. त्यानंतर सीडब्ल्यूसीचे संचालक अनंत कुमार गुप्ता यांनी मुख्य अभियंत्यांच्या मान्येतने २६ जानेवारी २०२६ रोजी अॅडव्होकेट कदम यांना लेखी पत्रव्यवहार करून याबाबतचा खुलासा केला आहे.
केंद्र सरकारने २००८ मध्ये १६ प्रकल्पांना राष्ट्रीय दर्जा दिला आहे. यात अलमट्टी धरणाचा समावेश नसल्याचे आयोगाने सांगितले आहे. धरणाला राष्ट्रीय दर्जा मिळावा, यासाठी कर्नाटक सरकारने आयोगाच्या कार्यालयाकडे कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. धरणाची उंची, साठवण क्षमता किंवा संबंधित कामांमध्ये वाढ करायला आयोगाने नकार दिलाय तर केवळ धरणाच्या दुरूस्तीला आयोगाने परवानगी दिलीय, असे केंद्रीय जल आयोगाने अॅड कदम यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे पूराचा धोका असणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्हयांना मोठा दिलासा मिळाला आहे.