माझ्या सोबत सर्वसामान्य जनता : आ. सतेज पाटील
कोल्हापूर – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून जनतेच्या पाठबळावर हे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रसिका पाटील, वाकरे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार लता माने आणि शिंगणापूर पंचायत मतदारसंघातील उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार सतेज पाटील यांची वाकरे येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते. दत्तू लिंबारी दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन जयसिंग पाटील या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
या सभेत बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, महापालिका निवडणूकीत चारच नगरसेवक निवडून येतील असे म्हणणारे राज्यसभा खासदार महाडिक यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला. वाढती महागाई, बदलापूर सारख्या घटकांमुळे असुरक्षित असलेल्या माता - भगिनी यासंदर्भात सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचे सांगत आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
काँग्रेसचे शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघासह पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करणे ही खरी दिवंगत पी एन पाटील आणि बोंद्रे दादांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी दादूमामा कामिरे यांनी, काँग्रेस शिवाय पर्याय नाही स्वर्गीय पी एन पाटील यांना खरी श्रद्धांजली व्हायचे असेल तर काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी अमर पाटील यांनी, विरोधक अफवा पसरवत असले तरी शिंगणापूर गावासह मतदारसंघातील जनता आपल्या सोबतच आहे, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रसिका पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी मनोगतं व्यक्त करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द राहू, अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मारुती माने यांच्यासह निवडणूक माघार घेतलेल्या पुष्पा पंडीत कळके यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेला गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, बाजीराव पाटील देवाळकर, यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, एस. के. पाटील, बाजीराव पाटील, के. डी. माने, सुरेश करपे, सागर सूयवांशी, भूषण पाटील, शिवाजी येरुडकर, विश्वास कामिरे आदी मान्यवर उपस्थित होते.