“सावली केअर सेंटर” येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांची मैफल
कोल्हापूर - समाजातील दिव्यांग व परावलंबी व्यक्तींची सेवा करणाऱ्या पीरवाडी येथील सावली केअर सेंटर येथे सोमवारी, दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा करा ओके कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोल्हापूर येथील श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या सहा कलाकारांनी हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांनी प्रजासत्ताक दिनाची संध्याकाळ भारावून टाकली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण कलाकारांनी केले.
प्रशांत प्रभावळकर यांनी “ये मेरे वतन के लोगो”, तर अभय नेर्लेकर व श्वेता कुलकर्णी या जोडीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे “ने मजसी ने” सादर केले. स्वरा अकोळकर यांनी “प्रभो शिवाजीराजा” या गीताने उपस्थितांची दाद मिळवली. ग्रुपच्या स्नेहा मुणगेकर यांनी “देश रंगीला रंगीला” तर सुनील सूर्यवंशी यांनी “संदेशे आते है” हे गीत सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. अभय नेर्लेकर यांनी “शूर आम्ही सरदार” हे गीत सादर करून कार्यक्रमात अधिक रंगत आणली. तसेच लहानगा स्वानंद अकोळकर याने “नन्हा मुन्ना राही हूँ” हे गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सुमारे अडीच तास रंगलेल्या या मैफलीत एकूण २२ हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सर्व कलाकारांनी एकत्र येत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या “जयोस्तुते” या गीताने केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सावली केअर सेंटरचे सर्वेसर्वा किशोर देशपांडे यांनी ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या कलाकारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी कलाकारांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय नेर्लेकर व स्नेहा मुणगेकर यांनी केले.