कागल तालुक्यात जि.प आणि पं.स. निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट...
कोल्हापूर - अर्ज माघारीनंतर कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत मुख्य लढत मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजीतसिंह घाटगे यांच्या युतीविरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये होणार आहे. या निवडणुकीत सर्वच नेत्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्हा परिषदचे कसबा सांगाव, सेनापती कापशी आणि बोरवडे हे मतदारसंघ देण्यात आले आहेत तर पंचायत समितीचे सावर्डे बुद्रक, नानीबाई चिखली, यमगे आणि कसबा सांगाव हे मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आले आहेत. संजय घाटगे यांना जिल्हा परिषदचे सिद्धनेर्ली आणि म्हाकवे गट तर पंचायत समितीचे साके, माद्याळ, हळदी आणि सेनापती कापशी हे मतदारसंघ देण्यात आले आहेत. समरजीतसिंह घाटगे यांच्याकडे जिल्हा परिषदेचा चिखली गट असून, पंचायत समितीचे म्हाकवे, सिद्धनेर्ली, बोरवडे आणि मौजे सांगाव हे मतदारसंघ देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत आघाडी केली आहे. तरीही म्हाकवे येथे शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. सिद्धनेर्ली पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा दिला आहे. मौजे सांगाव मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलाय इतर मतदार संघांमध्ये स्वाभिमानी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यात युती झाली आहे. उबाठा पक्ष म्हाकवे जिल्हा परिषद गटातून आणि यमगे, म्हाकवे, हळदी आणि माद्याळ पंचायत समिती गणांमधून निवडणूक लढवत आहे तर काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदचे कापशी आणि कसबा सांगाव हे गट आणि पंचायत समितीचे सिद्धनेर्ली आणि साके हे मतदारसंघ लढवत आहे.
याशिवाय वंचित बहुजन आघाडीने पंचायत समितीच्या तीन मतदार संघांत आपले उमेदवार उभे केले आहेत. एकूणच कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका बहुरंगी, चुरशीच्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.