चंदीगडमधील ऑल इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रतीक्षा साठेला सुवर्ण पदक
कोल्हापूर - चंदीगडमध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत देशभरातून विविध विद्यापीठांच्या नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत इचलकरंजीतील प्रतीक्षा बाळू साठे हिने घवघवीत यश मिळवले आहे.
५३ किलो वजन गटात प्रतिक्षाने स्नॅच प्रकारात ७६ किलो आणि क्लिन अँड जर्क प्रकारात १०० किलो असे एकूण १७६ किलो वजन उचलत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. विद्यापीठाला सुवर्ण पदक मिळवून देणारी ती पहिली महिला वेटलिफ्टर ठरली आहे. प्रतीक्षा सध्या जालन्यातील मत्स्योदरी बी.पी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विश्वनाथ माळी, विजय माळी, शुभम फाकडे तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते अजिंक्य रेडेकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.