आतापर्यंत ‘या’ दिग्गज नेत्यांनी विमान अपघातात गमावला आपला जीव... 

<p>आतापर्यंत ‘या’ दिग्गज नेत्यांनी विमान अपघातात गमावला आपला जीव... </p>

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या अचानक निधनामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. राजकारणातील सक्रिय नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. 
विमान अपघातात नेत्यांचा मृत्यू होण्याचा देशातील हा पहिलाच इतिहास नाही, यापूर्वी असे अनेक नेते होवून गेले ज्यांनी विमान अपघातात आपला जीव गमावला. ज्यामुळे देशासह राज्याचं राजकारण बदललं. 


यामध्ये काँग्रेस नेते संजय गांधी, माजी नागरी उड्डाण मंत्री माधवराव सिंधिया, तेलुगु देशम पक्षाचे वरिष्ठ नेते जी.एम.सी. बालयोगी, मेघालयचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन सांगमा, हरियाणाचे माजी मंत्री ओम प्रकाश जिंदल आणि मंत्री सुरेंद्र सिंग, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश यात होतो. 

संजय गांधी 
काँग्रेस नेते संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी मृत्यू झाला. ते दिल्ली फ्लायिंग क्लबच्या लहान विमानातून उड्डाण करत होते. हवेत कसरती करताना विमानावरील त्यांचं नियंत्रण सुटल्याने ते सफदरजंग विमानतळाजवळ कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
 

माधवराव सिंधिया 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री माधवराव सिंधिया यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. कानपूर येथे जाहीर सभेसाठी जात असताना उत्तर प्रदेशातील मणिपुरीजवळ खराब हवामानामुळे त्यांचे खासगी विमान कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
 

जी.एम.सी. बालयोगी 
माजी लोकसभाध्यक्ष आणि तेलुगु देशम पक्षाचे वरिष्ठ नेते जी.एम.सी. बालयोगी यांचे आंध्र प्रदेशात ३ मार्च २००२ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. 
 

मंत्री सायप्रियन सांगमा
मेघालयचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन सांगमा यांचे हेलिकॉप्टर अपघातात २२ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली होती.
 

ओम प्रकाश जिंदल 
हरियाणाचे माजी मंत्री ओम प्रकाश जिंदल आणि मंत्री सुरेंद्र सिंग यांचा २००५ साली सहारनपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने मृत्यू झाला.
 

वाय. एस. राजशेखर रेड्डी 
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. नल्लमाला जंगल परिसरात हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनी ते कोसळल्याचे स्पष्ट झाले. २४ तासांच्या शोध मोहिमेनंतर त्यांचे पार्थिव सापडले होते.
 

दोरजे खांडू 
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजे खांडू यांचे ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातामुळे राज्यासह संपूर्ण देशात शोककळा पसरली होती.
 

जनरल बिपिन रावत
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ एमआय-१७ व्ही५ (Mi-17V5) या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांची पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
 

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा गेल्या वर्षी अहमदाबादजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेले एअर इंडिया फ्लाइट AI-171 टेकऑफनंतर काही वेळातच कोसळले. या अपघातात अनेकांचा जीव गेला होता.