‘या’ प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी संपावर...
कोल्हापूर - युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आज देशव्यापी संप पुकारला. गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. गेल्या २ वर्षांआधी ५ दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य झाली असून अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याकडे केंद्र सरकाराने दुर्लक्ष केल्याने आज बँक कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.
देशभरातील १८ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार बँक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. बँक कर्मचारी संपावर गेल्याने दिवसभर बँकींग सेवा विस्कळीत झाली होती. आज कोल्हापूर जिल्ह्यातही युनायटेड फोरम ऑफ बैंकिंग युनियन्स संघटनेच्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधले.
जर केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बँक कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा कोल्हापुरातील संघटनेचे पदाधिकारी सुशांत मुळीक यांनी दिला आहे.
बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संपात सहभाग घेतल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४५० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे.