जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी कारवायांना गती द्यावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

<p>जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी कारवायांना गती द्यावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे</p>

कोल्हापूर - जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज राजर्षी शाहू सभागृहात  जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, डोंगर परिसर, फार्म हाऊस या ठिकाणी तसेच राधानगरी, चंदगड, गगनबावडा या तालुक्यांमधील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलीस विभागामार्फत तपासणी करून अंमली पदार्थ खरेदी किंवा विक्री होणार नाही, याची खातरजमा करण्याची सूचना दिली.

शिरोली, हातकणंगले आणि गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतींमध्ये बंद पडलेले तसेच चालू केमिकल कारखान्यांची एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलीस विभागामार्फत तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.  शिक्षण, पोलीस विभागामार्फत शहरासह जिल्ह्यातील माध्यमिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत, पोलीस पाटलांमार्फत ग्रामस्तरावर अंमली पदार्थ विक्रीबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.

या बैठकीला महिला आणि बाल विकास विभाग अधिकारी सुहास वाईंगडे, माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.