संविधान हाच देशातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा आधार : पालकमंत्री
कोल्हापूर – संविधान हाच देशातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा आधार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आज जिल्ह्याचा मुख्य ध्वजावंदन सोहळा पोलीस परेड मैदानावर संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायले गेले. पालकमंत्र्यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी परेड कमांडर आरांक्षा यादव यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उषाराजे हास्कुलच्या विद्यार्थ्यांनी गोंधळगीत सादर केले तर विविध शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवायती मधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी हुतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संविधानातील मूल्य जपण्यासाठी, जिल्ह्याला आणि देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम करुया असे आवाहन केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे तसेच जिल्ह्यातून विक्रमी रुपये २ कोटी २४ लाख ९९ हजार सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. भारत मंडपम्, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकगीत स्पर्धेत महाराष्ट्राने सादर केलेल्या डॉ. आझाद नायकवडी यांच्या दिग्दर्शनाखालील आई अंबाबाईच्या गोंधळाला संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक मिळाला. यातील विजेते श्रद्धा तानाजी जाधव, जान्हवी सागर कांबळे, अनुष्का प्रकाश शिंदे, रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ, पायल विशांत खोचीकर, कल्याणी दत्तात्रय चव्हाण, लावण्या रविंद्र चव्हाण, श्रेयश प्रवीण जाधव, रामदास देसाई, ओम प्रसाद तारे आणि सानिका धोंड यांचा सत्कार करण्यात आला.
कागल मधील गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुस यात्रेत आकाश पाळण्यात अडकलेल्या १८ नागरिकांची सुरक्षित सुटका केल्याबद्दल स्थानक अधिकारी जयवंत मल्हारी खोत, ओमकार श्रीनिवास खेडकर, वाहनचालक अमोल विश्वास शिंदे, फायरमन प्रमोद प्रभाकर मोरे आणि अभय रावसाहेब कोळी यांचा सत्कार करण्यात आला.
आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, कार्यक्रम समन्वयक प्रज्ञा संकपाळ, जिल्हा सल्लागार (एनटीपीसी) विक्रम आनंदराव आरळेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज किरण जयसिंग पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज रघुनाथ पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजीत बाबासो धनवडे, बँक ऑफ इंडिया जिल्हा प्रबंधक पुनित द्विवेदी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, आणीबाणीतील सहभागी, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना पुष्प देऊन पालकमंत्री आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.