मांडेदुर्गच्या रामचंद्र पवार यांची वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती; निवड होणारे महाराष्ट्र राज्यातील पहिले प्रशिक्षक

<p>मांडेदुर्गच्या रामचंद्र पवार यांची वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती; निवड होणारे महाराष्ट्र राज्यातील पहिले प्रशिक्षक</p>

चंदगड - मांडेदुर्ग येथील रामचंद्र पवार यांची पुरुषांच्या वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघ, नवी दिल्ली व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षण शिबिर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ट्रेनिंग सेंटर, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे 25 ते 31 मार्च या कालावधीत होणार आहे. हे शिबिर येणाऱ्या वरिष्ठ आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

याचबरोबर 2 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान झेग्रॅब (क्रोएशिया) येथे होणाऱ्या प्रथम जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धेसाठी देखील रामचंद्र पवार यांची भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी कनिष्ठ भारतीय महिला कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य करताना अथेन्स (ग्रीस) येथे भारताला जागतिक अजिंक्य पद मिळवून दिले होते. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना आता वरिष्ठ भारतीय पुरुष कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्यातून वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त होणारे रामचंद्र पवार हे पहिले आणि एकमेव प्रशिक्षक आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.