महाराष्ट्र थांबणार नाही, आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बळावर...: मुख्यमंत्री
मुंबई – “महाराष्ट्र थांबणार नाही. आपल्या संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बळावर राज्य अधिक गतिमान आणि समृद्ध होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यक्त केला. दादरमधील शिवाजी पार्क येथे त्यांनी ध्वजवंदन केले.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी, 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंगीकारून लोकशाही प्रजासत्ताकाची पायाभरणी केल्याची आठवण करून दिली. पुढच्या टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा सरकारचा ठाम प्रयत्न राहणार असे म्हणत त्यांनी, महाराष्ट्र थांबणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.
जगातील सर्वोत्तम संविधान आपल्याला लाभले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मिती समितीला आपण मानवंदना अर्पण करतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर देशाची प्रगती उभी असल्याचे त्यांनी नमूद केले.