वाशी परिसरात साड्या वाटपाचा डाव उधळला; भरारी पथकाची धडक कारवाई

<p>वाशी परिसरात साड्या वाटपाचा डाव उधळला; भरारी पथकाची धडक कारवाई</p>

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वाशी परिसरात महिला मतदारांना साड्या वाटप करून आकर्षित करण्याचा प्रयत्न भरारी पथकाने ऐनवेळी उधळून लावला. मतदारांना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात साड्या आणल्याच्या संशयावरून भरारी पथकाने एक टेम्पो ताब्यात घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील वाशी येथील शिव सरस्वती हॉलमध्ये महिला मतदारांना साड्या वाटप केल्या जाणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई करत सुमारे पाच लाखापेक्षा जास्त किंमतीच्या साड्यांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेला टेम्पो करवीर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात साड्यांचा साठा कोणी आणला, कशासाठी आणला आणि यामागे नेमका कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी पोलीस व निवडणूक प्रशासनाकडून सुरू आहे.

दरम्यान, शिव सरस्वती हॉलमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांच्या जिल्हा परिषद उमेदवाराकडून महिलांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात भरारी पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे निवडणूक प्रचारातील गैरप्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.