मंत्री छगन भुजबळांना क्लीन चीट नाही...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कोर्टात दाद मागणार
मुंबई – मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता झाली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, मंत्री छगन भुजबळ यांना मागच्या आणि आत्ताच्या दोन्ही सरकारने वाचवलं आहे. फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे कि, छगन भुजबळांविरुद्ध 2014 ला जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे. एकूण 11 घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे यासंदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती. तीन गुन्हे दाखल झाले, आतापर्यंत दोन गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला आहे, एक गुन्हा बाकी आहे. कोर्टाला योग्य ती माहिती न दिल्यामुळे गुन्हे रद्द केले असतील, मी मुख्य न्यायमूर्तींकडे यासंदर्भात पत्र लिहणार आहे. कलिना सेंट्रल लायब्ररीचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, अद्याप छगन भुजबळांना क्लीन चीट नाही, असे म्हणत आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.