रुपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल...
पुणे – महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीवेळी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे- पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे उपअभियंता सुधीर अलूरकर यांनी फिर्याद दिल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ आणि प्रभाग क्रमांक २६ मधून रुपाली ठोंबरे – पाटील यांनी निवडणूक लढवली. त्याची मतमोजणी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात झाली. त्या वेळी ईव्हीएम बदलल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच लेखी हरकतही नोंदवली आणि या अर्जाची पोच देण्याचा आग्रह त्यांनी धरला.
तसेच मतमोजणी केंद्रावरील जाळीजवळ जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत संवाद साधला. शासकीय कामकाजात अडथळा आणला, असे उपअभियंता सुधीर अलूरकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.