भूमी मोजणीसाठी लाच घेताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अँटी करप्शन च्या जाळ्यात

चंदगड भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार; ३ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई

<p>भूमी मोजणीसाठी लाच घेताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अँटी करप्शन च्या जाळ्यात</p>

कोल्हापूर - चंदगड तालुक्यात भूमी मोजणी, हद्द निश्चिती व फायनल नकाशा देण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडलंय.

या प्रकरणी तक्रारदार पुरुष यांनी २२ जानेवारी २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार भूमी अभिलेख कार्यालय, चंदगड येथे कार्यरत असलेला विजय आप्पासाहेब कानडे (वय ३३, रा. बेळगुंदी ता. गडहिंग्लज) याने जमिनीची मोजणी व नकाशा देण्यासाठी एकूण ८ हजार रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी ५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित ३ हजार रुपयांची मागणी त्याने केली होती. २२ जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी स्पष्ट झाल्याने त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. आरोपी विजय कानडे याने तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली असून तपासासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून झडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 

ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर पुढील तपास करीत आहेत.